लखीचंद जैन सवाई माधोपूर, डिसेंबर 2007 पूर्व राजस्थानातील सवाई माधोपूर-टौंकच्या आसपासच्या गाव-खेडयांमध्ये जावून तिथले मांडणा पुन्हा एकदा बघायचे मनात होते. फार वर्षांपपूर्वी इथले मांडणा मी बघितले होते. त्यांचा अभ्यासही केला होता. शोधाभ्यासाचा एक भाग म्हणूनही आताच्या मांडण्याविषयी माझ्या मनात थोडी उत्सुकता होती.
मुंबईतल्या बी डी सोमाणी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसोबत पहाटे-पहाटे रणथंबोरच्या नॅशनल पार्कची मॉर्निंग टायगर सफारी उरकून भाडयाच्या जीपने मी आणि जयेश आम्ही दोघं टौंक जिल्ह्यातील अलिगढला पोहोचलो. तिथून बनेठा (उनियरा तहसील, जि. टौंक) च्या राधेश्याम मीणा या आदिवासी मित्राला सोबतीला घेऊन आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. सवाई माधोपूर ते अलिगढच्या सडक मार्गावर मातीच्या कच्च्या घरांच्या भिंती आणि झोपडयांवर मांडण्यांचे मोर नजरेस पडत होते. |